कल्पना करा, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ आपण गच्चीवर उभे आहोत. अगदी नि:शब्द, शांत एकांतात… अंतर्मुख करणारी रात्र! वर अंतराळात असंख्य चांदण्या आहेत. काही जवळ भासणाऱ्या, काही त्यांच्या पलीकडे असलेल्या, तर काही केवळ भास आहेत की काय, असे वाटणाऱ्या! सारेच खरे, सारेच खोटे! आणि प्रत्येक श्वासागणिक जणू हे चांदणे आपण स्वतःमध्ये भरून घेत आहोत. इतके की, मी आणि हे ब्रह्मांड एकरूप झाले आहे, असे वाटावे. “कोण मी चाफा… कोठे दोघे जण रे” अशी अवस्था! मनसोक्त चांदणे प्याल्यानंतर…
अशाच वेळी कदाचित सर्वेश्वरदयाल सक्सेना यांना चाँदनी की पाँच परतें ही कविता सुचली असावी…
चाँदनी की पाँच परतें,
हर परत अज्ञात है
एक जल में,
एक थल में,
एक नीलाकाश में
एक आँखों में तुम्हारे झिलमिलाती,
एक मेरे बन रहे विश्वास में
क्या कहूँ, कैसे कहूँ
कितनी ज़रा-सी बात है
चाँदनी की पाँच परतें,
हर परत अज्ञात है….
कदाचित कवी येथे अवकाशातील चांदण्यांचे एकेक पदर उलगडताना स्वतःचे अस्तित्वही उलगडत आहे. पाण्यात दिसणारे चांदणे — जिथे ते दिसते, पण मुळात तिथे नसतेच! जे दिसते, तेही अस्थिर असते. हलणाऱ्या पाण्यासोबत तेही हलत राहते. जमिनीवर पडलेले चांदणे, आकाशातले चांदणे, त्याच्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांत झिलमिलणारे चांदणे आणि त्या नात्यासाठी मनात आकार घेत असलेला विश्वास….
अशा या पाच प्रतिमा!
हेही वाचा – प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!
कदाचित पाण्यातील प्रतिबिंब स्वतःच्या अस्थिर प्रतिमेचे दर्शन घडवत असेल. जमिनीवरचे चांदणे अस्तित्वाची दृश्य जाणीव करून देत असेल, तर आकाशातले चांदणे स्वतःलाही अज्ञात असलेले स्वतःचे रूप दर्शवत असेल.
एक रूप असे, जे आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांत दिसते; आणि एक असे, ज्यामुळे भविष्याची स्वप्ने रंगवण्याचा विश्वास मिळतो. या प्रतिमांकडे पाहताना सुरुवातीच्या तीन प्रतिमा बाह्य जगाशी निगडित आहेत, चौथी नातेसंबंधांशी, तर पाचवी स्वतःच्या अंतर्मनाशी जोडलेली आहे, असे जाणवते.
खरोखर, एकाच व्यक्तीची अशी अनेक रूपे असतात. बाह्य जगासाठी आपण वेगळे असतो, आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वेगळे असतो आणि स्वतःबद्दलची आपली धारणा ही वेगळी असते. दुसऱ्या कडव्यात ही कविता आणखी खोल शिरते.
एक जो मैं आज हूँ,
एक जो मैं हो न पाया,
एक जो मैं हो न पाऊँगा कभी भी,
एक जो होने नहीं दोगी मुझे तुम,
एक जिसकी है हमारे बीच यह अभिशप्त छाया
क्यों सहूँ, कब तक सहूँ
कितना कठिन आघात है
चाँदनी की पाँच परतें,
हर परत अज्ञात है…
एक आपण आज आहोत. एक असे रूप, जे होण्याची आपली इच्छा होती, परंतु आपण होऊ शकलो नाही. एक असे, जे आपल्याला व्हायचे आहे; पण कदाचित जे होणे आपल्या आवाक्याबाहेर आहे. काही गोष्टी अशा असतात, ज्या केवळ स्वप्नांतच राहतात… आणि एक असे रूप, जे आपण होऊ शकलो असतो; परंतु प्रेमाच्या नात्यात गुंतून राहिल्यामुळे कदाचित होता आले नाही.
खरोखर, प्रेम आपल्याला समृद्ध करते; पण त्याची किंमतही मोजावी लागते. एखाद्या नात्यात आपण स्वतःला इतके बदलतो की, स्वतःचे खरे रूपही मागे पडावे. आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या वाटाही संकुचित व्हाव्यात. प्रेमासाठी केलेल्या तडजोडींतून कधी कधी आपण स्वतःपासूनच दूर जातो.
…आणि एक रूप असेही असते, जे आपण नव्हतो; पण आपल्यावरील आरोपांची सावली आपण दूर करू शकलो नाही. सत्य माहीत असूनही, त्या आरोपांच्या सावलीत स्वतःला सिद्ध करता न येण्याची असहाय्यता किती काळ सहन करायची, असा प्रश्न कवी स्वतःलाच विचारतो.
हेही वाचा – सफर ‘मुसाफिर कॅफे’ची
खरोखर, ही कविता चांदण्यांचा, पर्यायाने स्वतःचा शोध घेणारी कविता वाटते. नात्यांत जपल्या जाणाऱ्या मौनाची, प्रेमात हरवलेल्या स्वप्नांची आणि असहाय्यतेची ही कविता वाटते. स्वतःचे अस्तित्व, आपल्या आकांक्षा आणि सत्य यांच्यामध्ये आपण हिंदोळे घेत असल्याची जाणीव प्रत्येकाला कधी ना कधी होत असते.
कारण माणूस म्हणजे केवळ एक चेहरा नाही, नाव नाही, तर त्या चेहऱ्याच्या आणि नावाच्या पलीकडेही बरेच काही आहे. स्वतःलाही पूर्णपणे माहीत नसलेली आपली अनेक रूपे, न जगता आलेली स्वप्ने, नात्यांसाठी केलेल्या तडजोडी आणि मनात दडवून ठेवलेले सत्य — या सगळ्यांचे मिळून आपले अस्तित्व बनते.
हे सारे सूक्ष्मपणे जाणवून देणारी ही कविता खरोखर विलक्षण आहे. कदाचित, म्हणूनच या कवितेच्या प्रत्येक पदरातून एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत राहतो — ‘कोऽहम्?’… मी कोण आहे? माझी दिसणारी आणि न दिसणारी रूपे, माझ्या आकांक्षा, माझ्या तडजोडी आणि माझ्या मनात दडलेले सत्य… या सगळ्यांच्या पलीकडे असलेला खरा ‘मी’ तरी कोण?



1 Comment
Mast